पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी त्यांच्या ऊस गाळपावर प्रतिटन १० रुपयांप्रमाणे होणारी रक्कम गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाकडे जमा करण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार दोन वर्षांत ३९ कोटी १९ लाख रुपये जमा झाली आहे. मात्र अद्यापही १९७ कोटी ८४ लाख रुपये कारखान्यांकडून येणे बाकी आहे.
याबाबत साखर आयुक्तालयातून प्राप्त माहितीनुसार साखर कारखान्यांनी आत्तापर्यंत २०२१- २२ वरील ऊस गाळपापोटी प्रतिटन तीन रुपयांप्रमाणे ३९ कोटी १९ लाख रुपये महामंडळाकडे जमा केले आहेत. मात्र, २०२१-२२ मध्ये अद्यापही प्रति टन ७ रुपयांप्रमाणे ९२ कोटी ५४ लाख रुपये बाकी आहेत. तसेच २०२२-२३ मधील दहा रुपयांप्रमाणे १०५ कोटी ३० रुपये कारखान्यांकडून येणे बाकी आहे. अशी एकत्रित रक्कम १९७ कोटी ८४ लाख रुपये गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळास कारखान्यांना द्यावे लागणार आहेत.
गाळप हंगाम कधी सुरु होणार ?
यंदाचा गाळप हंगाम कधी सुरु होणार याचा निर्णय या आठवड्यात होणाऱ्या मंत्री समितीच्या बैठकीत होईल. मात्र, उसाची टंचाई आणि उतारा घटण्याच्या शक्यतेने हंगाम सुरु करण्याबाबत मत – मतांतरे आहेत. राज्य सरकार हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यास अनुकूल आहे. मात्र काही कारखानदारांसह ‘विस्मा’ने यंदाचा हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करावा, अशी मागणी केली आहे. सद्यस्थितीत अनेक जिल्ह्यांत गुऱ्हाळघरे, खांडसरी सुरू झाल्या आहेत. अनेक शेतकरी गुऱ्हाळघरे, खांडसरीला ऊस पाठवीत आहेत. त्याचा फटका साखर कारखान्यांना बसू शकतो. त्यामुळे १५ ऑक्टोबरपासून गळीत हंगाम सुरू करावा अशी मागणी ‘विस्मा’ने केली आहे.