नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने नवा उच्चांक निर्माण केला आहे. मंगळवारी कोविड १९ संक्रमितांची एकूण संख्या २ कोटींवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पुन्हा तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासात देशात ३,५७,२२९ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण संक्रमितांची संख्या २,०२,८२,८३३ झाली आहे. तर याच कालावधीत ३४४९ जणांचा मृत्यू झाला असून एकूण कोरोना बळींची संख्या २ लाख २२ हजार ४०८ झाली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सध्या देशात ३४ लाख ४७ हजार १३३ सक्रिय रुग्ण आहेत. ही चिंतेची बाब आहे. हे रुग्ण रुग्णालयांत तसेच होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत.
देशात एक मे रोजी उच्चांकी ४,०१,९९३ नवे रुग्ण आढळले. तर दोन मे रोजी ३,९२,४८८ रुग्ण आढळले होते. तीन मे रोजी ३,६८,१४७ रुग्ण आढळले. त्यामुळे गेल्या चार दिवसांत १५ लाख १९ हजार नवे रुग्ण आढळले आहेत. तर एप्रिल महिन्यात ६६ लाख रुग्ण आढळून आले होते.
उपलब्ध आकडेवारीनुसार देशात १,६६,१३,२९२ जण बरे झाले आहेत. देशात सात ऑगस्ट रोजी कोरोना रुग्णांची संख्या २० लाखांवर होती. तर २३ ऑगस्ट रोजी ती ३० लाखांवर पोहोचली. पाच सप्टेंबर रोजी देशात ४० लाख आणि १६ सप्टेंबर रोजी रुग्णसंख्या ५० लाखांवर गेली. त्यानंतर २८ सप्टेंबर रोजी रुग्णसंख्येने ६० लाखांचा आकडा पार केला. ११ ऑक्टोबर रोजी ७० लाख, २९ ऑक्टोबर रोजी ८० लाख, २० नोव्हेंबर रोजी ९० लाख तर १९ डिसेंबर रोजी एक कोटी रुग्णसंख्या झाली होती. १९ एप्रिल रोजी देशात दीड कोटी रुग्णसंख्या झाल्याचे दिसून येते.