सांगली : क्रांती अग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू आहे. कारखान्याने आतापर्यंत २ लाख ८७ हजार ७२० मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून २ लाख २८ हजार ६७० क्विंटल साखर उत्पादन झाल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी दिली. कारखाना यंदापासून गाळपाला येणाऱ्या उसाला १५ रुपये दराने प्रती मे. टन अर्धा किलो साखर शेतकऱ्यांना देणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
अध्यक्ष लाड म्हणाले की, कारखान्याकडून यंदापासून ५० टक्के सवलतीच्या दरावर ऊस बियाणे पुरवठाही होत आहे. ऊस उत्पादक सभासदांना कोणताही भेदभाव न करता ५० ते ५५ हजारांच्या ऊस विकासासाठीच्या सुविधा पुरवते. त्यामुळे शेतकऱ्यांचे एकरी उत्पादन वाढले आहे. उत्पादन खर्चही कमी झाला. कार्यक्षेत्रात ठिबक सिंचनाखालील क्षेत्रात वाढविण्यासाठी नवनवीन योजना राबविल्या जात आहेत. गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी मी स्वतः ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी दौरा केला. त्यातील मागणीनुसार साखर देण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी कार्यकारी संचालक सी. एस. गव्हाणे, सचिव आप्पासाहेब कोरे, संचालक सतीश चौगुले, सुभाष वडेर जितेंद्र पाटील, सुकुमार पाटील, पी. एस. माळी, संग्राम जाधव, संजय पवार, अशोक विभूते, अनिल पवार आदी उपस्थित होते.