सोलापूर : सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याया यंदा, २०२३-२४ मधील २४ व्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ यशस्वी झाला. अतिशय आव्हानात्मक स्थितीत सुरू झालेल्या या हंगामात कारखान्याने २ लाख ३५ हजार ३८१ मे. टन उसाचे गाळप केल्याची माहिती चेअरमन कल्याणराव काळे यांनी दिली. हंगामात कारखान्याने ९.२२ टक्के साखर उताऱ्यासह २ लाख ७०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. तर डिस्टिलरी प्रकल्पातून आजअखेर २९ लाख ४६ हजार ६४६ ब. लि., सहवीज निर्मिती प्रकल्पातून १ कोटी ७० लाख ४७ हजार ८५० युनिट वीजनिर्मिती केली आहे. कारखान्याने ८१ लाख ९३ हजार युनिट वीज निर्यात केल्याचेही काळे यांनी स्पष्ट केले.
ऊस वाहतूक ठेकेदार धनाजी कवडे व त्यांच्या पत्नी सविता कवडे यांच्या हस्ते काटा पूजन करण्यात आले. गळीत हंगामात जास्त ऊस वाहतूक केलेल्या बैलगाडी, वाहनमालक, मुकादमांचा सत्कार करण्यात आला. कारखान्याने ऊसबिले व तोडणी वाहतूक कमिशनसह बिले हंगाम सुरू झाल्यापासून १० दिवसांत अदा केली आहेत. अंतिम बिलेही लवकरच बँक खात्यावर जमा करण्यात येतील, असेही काळे म्हणाले. कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांनी स्वागत केले. रावसाहेब पवार यांनी सूत्रसंचालन केले. संचालक युवराज दगडे यांनी आभार मानले. उपाध्यक्ष भारत कोळेकर, कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते.