अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील गौरी शुगर कारखान्याने गाळपाचे पहिले वर्ष असताना उसाचा भाव आणि सरासरी गाळप यामध्ये आघाडी मारली आहे. दि. ३० नोव्हेंबर अखेर २,३६० शेतकऱ्यांचा २ लाख मेट्रिक टन ऊस गाळप केला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ३,००६ रुपयाप्रमाणे ४० कोटी ६० लाख जमा केले आहेत. ‘गौरी शुगर’चे अध्यक्ष बाबुराव बोत्रे-पाटील म्हणाले की, हिरडगावचा साखर कारखाना सुरु करुन तो चालविणे एक आव्हान होते. पण राज्यातील विविध भागात पाच साखर कारखाने चालविण्याचा अनुभव या ठिकाणी कामी आला.
बोत्रे-पाटील म्हणाले कि, कामगार आणि शेतकऱ्यांनी केलेल्या सहकार्यामुळे गाळप हंगाम यशस्वीपणे सुरु आहे. त्यामुळे पहिल्याच गाळप हंगामात पहिला हप्ता ३ हजार ६ रूपयांनी काढणे शक्य झाले. २४० केपीएलडी क्षमतेच्या डिस्टलरीचे काम सुरु आहे. केंद्र शासनाने यंदाच्या गाळप हंगामात इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली आहे. त्यामुळे चांगल्या दर्जाची साखर निर्माण करत साखर कारखानदीचा गोडवा वाढवावा लागणार आहे. इथेनॉल निर्मिती सुरु झाली कि उत्पन्नात आणखी भर पडेल, असा विश्वास बोत्रे-पाटील यांनी व्यक्त केला.