ऊस तोडणी मुकादमांकडून वाहनमालकांची २० कोटींची फसवणूक

सोलापूर : करमाळा तालुक्यातील सुमारे दोनशे वाहनमालकांना तोडणी मुकादमांकडून ऊस तोडणीसाठी मजूर पुरविण्याच्या बहाण्याने करार करून सुमारे वीस कोटी रुपयांची फसवणूक करण्याचे प्रकार घडले आहेत. या व्यवसायासाठी गुंतवलेले लाखो रुपयांचे भांडवल तोडणी मजूर न आल्याने बसून राहत असून, अनेक शेतकऱ्यांना या व्यवसायासाठी आपल्या जमिनी विकण्याची वेळ आली आहे. वाहनचालकांना न्याय देण्यासाठी पोलिस आणि कारखान्यांकडून मदतीची गरज असल्याचे ऊस वाहतूकदार शिवाजी नाईकनवरे यांनी सांगितले.

तालुक्यात तीन साखर कारखाने आहेत. तालुक्यातील शेतकरी कार्यक्षेत्राबाहेरील कारखान्यांनाही मोठ्या प्रमाणावर ऊस देतात. त्यामुळे ऊस वाहतूकदार सुमारे ३० लाखांपर्यंतची गुंतवणूक करून व्यवसाय करण्यास पुढे येत आहेत. त्यांची फसवणूक होत आहे. ऊस तोडणी मुकादम एकापेक्षा जास्त वाहन मालकांकडून ॲडव्हान्सची रक्कम घेतात. दरवर्षी पंधरा ते वीस टक्के वाहन मालकांची फसवणूक होते. याबाबत शेटफळ येथील ऊस वाहतूकदार शिवाजी नाईकनवरे म्हणाले की, फसवणूक करणारे ऊस तोडणी मुकादम मजूरांसह त्या गावातून गायब होतात. त्यामुळे पैसे वसुलीची शक्यता कमी आहे. त्यासाठी स्थानिक पोलिस प्रशासनाचे सहकार्य हवे. तर करमळा युवा सेनेचे अध्यक्ष शंभुराज फडतरे म्हणाले की, तालुक्यातील अनेक वाहन मालकांचे पैसे ऊस तोडणी मजूर व मुकादमांकडे अडकले आहेत. ते वसूल करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here