कोल्हापूर : हलकर्णी (ता. चंदगड) येथील अथर्व-दौलत कारखान्याने आतापर्यंत १ लाख ८० हजार मेट्रिक टनाचे गाळप केले आहे. कारखान्याने १ ते १५ डिसेंबर या कालावधीतील ऊस बिले ३१०० रुपये प्रतीटनाप्रमाणे २० कोटी ६९ लाख ९८ हजार १६९ रुपये संबंधित ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी दिली.
अध्यक्ष खोराटे म्हणाले की, यावर्षीचा गळीत हंगाम उत्तमरित्या सुरु आहे. शेतकऱ्यांचा ऊस वेळेत कारखान्याला यावा, यासाठी शेती विभागामार्फत तोडणी व ओढणी यंत्रणेचे चांगल्या पध्दतीने नियोजन केले आहे. कारखान्यात निघणाऱ्या प्रेसमडवर प्रक्रिया करून उत्कृष्ट आणि उच्च प्रतीचे कंपोस्ट खताची निर्मीती करत असून ते माफक दरात शेतकऱ्यांना उपलब्ध आहे. यावेळी पृथ्वीराज खोराटे, संचालक विजय पाटील, युनिट हेड महेश कोनापुरे यांच्यासह कारखान्याचे खातेप्रमुख उपस्थित होते.शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस गाळपासाठी पाठवावा, असे आवाहन खोराटे यांनी केले.