नवी दिल्ली : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (ISMA) म्हणण्यानुसार, भारताने चालू हंगाम २०२२-२३ मध्ये आतापर्यंत जवळपास ३५ लाख टन साखर निर्यातीचे करार केले आहेत. यापैकी जवळपास २ लाख टन साखर ऑक्टोबर २०२२ पर्यंत निर्यात होवून देशातून बाहेर गेली आहे. तर गेल्यावर्षी याच महिन्यात जवळपास ४ लाख टन साखर निर्यात करण्यात आली होती.
केंद्र सरकारकडून ५ नोव्हेंबर रोजी जाहीर २०२२-२३ च्या साखर निर्यात धोरणात ३१ मे अखेर, कोट्याच्या आधारावर ६० लाख टन साखर निर्यातीस अनुमती देण्यात आली आहे. देशात आता नवा साखर हंगाम सुरू झाला आहे. आणि सरकार देशांतर्गत उत्पादनाच्या आधारावर अभ्यासानंतर साखर निर्यात कोटा वाढवेल, अशी शक्यता आहे.
देशातील साखर कारखान्यांनी सध्याच्या हंगामात १५ नोव्हेंबरपर्यंत १९.९ लाख टन साखर उत्पादन घेतले आहे, जे गेल्या एक वर्षाच्या समान कालावधीतील २०.८ लाख टनापेक्षा थोडे कमी आहे. पश्चिमेकडील अनेक साखर कारखाने या हंगामात उशीरा सुरू झाले आहेत. त्यामुळे १५ नोव्हेंबरपर्यंत साखर उत्पादन थोडे कमी झाले आहे.