लखनौ : हंगाम २०२२-२३ मध्ये ऊस गळीत हंगामात उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादनात नऊ टक्क्यांची वाढ झाली आहे. बिजनौर जिल्ह्याने १,२३३ लाख क्विंटल ऊस उत्पादनासह राज्यात अव्वल स्थान मिळवले आहे. उत्तर प्रदेशात ११९ साखर कारखाने आहेत. आणि ५० लाखांहून अधिक शेतकरी कमीत कमी २७ लाख हेक्टर शेत जमिनीवर ऊस पिक घेतात. यावर्षी राज्यात १,१०२.४९ लाख टन ऊस पिक घेण्यात आले होते. राज्यातील साखर कारखान्यांनी १,०९९.४९ लाख टन आणि छोट्या युनिट्सनी ३.०५ लाख टन ऊसाचे गाळप केले. कारखान्यांनी १०५ लाख टन साखर उत्पादन केले आहे.
ऊस पिकासाठी हवामान अनुकूल आहे. त्याशिवाय, आमच्या शेतकऱ्यांना ऊसाच्या चांगल्या प्रजातींबाबत प्रशिक्षण जेण्यात आले आहे. खते, बियाणे, किटकनाशकांसह नव्या तंत्राची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे ऊसाचे चांगले उत्पादन झाले आहे. बिजनौर जिल्ह्याने पहिले स्थान पटकावले असून लखीमपूर आणि मुजफ्फरनगरने दुसरे व तिसरे स्थान मिळवले असे अतिरिक्त ऊस आयुक्त व्ही. के. शुक्ला यांनी सांगितले.
दरम्यान, सहारनपूरचे ऊस उपायुक्त ओ. पी. सिंह यांनी टीओआयला सांगितले की, आम्ही शेतकऱ्यांना शेतीसाठी विविध पद्धती, पाण्याचा योग्य वापर, पिकाच्या शिल्लक अवशेषांचे व्यवस्थापन आदींबाबत प्रशिक्षण देतो. त्यामुळे त्यांना पर्यावरणास अनुकूल पद्धतीने अधिक उत्पादन मिळविण्यास मदत होते.