पुणे : महाराष्ट्रातील गाळप हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला असून साखर आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 7 एप्रिल 2025 अखेर राज्यातील 200 पैकी 197 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे. राज्यात सध्या केवळ 3 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरु आहे. त्यामध्ये पुणे विभागातील 2 आणि नागपूर विभागातील 1 साखर कारखान्याचा समावेश आहे.
आतापर्यंत महाराष्ट्रात 806.45 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. यंदा साखरेचे उत्पादन गेल्या हंगामातील समान कालावधीत उत्पादित झालेल्या 1095.81 लाख क्विंटलपेक्षा सुमारे 289.36 लाख क्विंटल कमी आहे. 7 एप्रिलपर्यंत राज्यातील कारखान्यांनी 846.06 लाख टन ऊस गाळप केले आहे, तर गेल्या हंगामात याच कालावधीत 1069.61 लाख टन उसाचे गाळप झाले होते. राज्याचा एकूण साखर उतारा दर 9.47 टक्के आहे, जो गेल्या हंगामातील समान कालावधीमधील 10.24 टक्के उताऱ्यापेक्षा कमी आहे.
राज्यात कोल्हापूर विभागाचा उतारा सर्वात जास्त 11.08 टक्के इतका आहे. त्यापाठोपाठ नांदेड विभागाचा 9.67 तर 9.64 टक्के उताऱ्यासह पुणे विभाग तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमरावती विभागाचा उतारा 8.95, अहिल्यानगर विभागाचा 8.93, सोलापूर विभागाचा 8.13, छत्रपती संभाजीनगर विभागाचा 8.03 आणि सर्वात कमी 5.01 टक्के उतारा नागपूर विभागाचा आहे.