छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात २१ दिवसात पाच सहकारी साखर कारखान्यांनी केवळ २ लाख २ हजार ५८४ मेट्रिक टन उसाचे गाळप केल आहे. त्यातून एक लाख ५६ हजार ६५ किंवटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले असून सरासरी उतारा केवळ ७.४५ टक्के आला आहे. जिल्ह्यात पैठण परिसरातील संत एकनाथ सहकारी-सचिन घायाळ शुगर, सिल्लोड तालुक्यातील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, पैठण तालुक्यातील विहामांडवा परिसरातील शरद सहकारी साखर कारखाना, कन्नड शहर परिसरातील बारामती ॲग्रो , छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील छत्रपती संभाजीराजे साखर कारखाना, गंगापूर तालुक्यातील शेंदूरवादा परिसरातील मुक्तेश्वर शुगर मिल आणि खुलताबाद तालुक्यात घृष्णेश्वर साखर कारखाना असे सात कारखाने आहेत. यापैकी शरद सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर पेटला परंतु साखर अद्याप बाहेर आलेली नाही. घृष्णेश्वर साखर कारखाना चालू होण्याची शक्यता कमी आहे.
सध्या पाच साखर कारखान्यांनी ऊस गाळप सुरू केलेले आहे. गंगापूर सहकारी साखर कारखान्याचा प्रवारा समूहासोबत (विखे पाटील) करार झाल्याने हा कारखाना सुरू होण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तसेच वैजापूर तालुक्यात नव्याने उभारणी झालेला पंचगंगा सिड्स कंपनीचा पंचगंगा शुगर हा खाजगी कारखानाही याचवर्षी गाळपास प्रारंभ करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे यावर्षी नव्या दोन साखर कारखान्यांची ऊस गाळपात भर पडणार आहे.
आजमितीला गाळप सुरू असलेल्या पाच साखर कारखान्यापैकी सर्वात जास्त प्रतिदिन ७ हजार मेट्रिक टन क्षमता कन्नडच्या बारामती ॲग्रोची आहे. या कारखान्याचे एक लाख १० हजार १३५ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ८५ हजार २५० किंवटल साखर पोत्यांचे उत्पादन केलेले आहे. छत्रपती संभाजी राजे साखर कारखान्याने १४०२६ मेट्रिक टन गाळप केले असून, ९६५० क्विटल साखर पोत्यांचे उत्पादन झालेले आहे. जिल्ह्यात ३८ हजार ३०३ मेट्रिक टन ऊस गाळप मुक्तेश्वर शुगर मिल्सने केले असून, तीस हजार पाचशे पंचवीस किंवटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. पैठणच्या संत एकनाथ-सचिन घायाळ शुगरने ३१ हजार १७० मेट्रिक टन उसाचे गाळप करून १९ हजार ५४० क्विटल साखर पोत्यांचे उत्पादन केलेले आहे. सिल्लोडच्या सिद्धेश्वरने १५९५० मेट्रिक टन उस गाळप करून ११०१०० क्विटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे.