केंद्र सरकारकडून फेब्रुवारी महिन्यासाठी २२.५० लाख टन साखर विक्री कोटा जारी

नवी दिल्ली : केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने बुधवारी फेब्रुवारी महिन्यासाठी देशातील साखर कारखान्यांना २२.५० लाख टनांचा साखर विक्री कोटा जाहीर केला आहे. हा कोटा जानेवारी महिन्याइतकाच आहे. दरम्यान, केंद्र सरकारने १० लाख टन साखर निर्यातीस मंजुरी दिली आहे. यंदा साखर उत्पादन घटेल हे लक्षात येऊनही निर्यातीस परवानगी दिल्याने साखर बाजारात उत्साह आहे. साखरेचे दर वाढू लागताच भविष्यात जादा दराने साखर खरेदी करावी लागेल या शक्यतेने शीतपेय, आईस्क्रिम उत्पादक कंपन्या लवकरच साखर खरेदी करतील, अशीही शक्यता उद्योगातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे दरात वाढ कायम राहण्याचा अंदाज असल्याचे सांगण्यात आले.

केंद्र सरकारने दिलेली १० लाख टन साखर निर्यातीस परवानगी आणि इथेनॉल दरवाढीच्या निर्णयाने सकारात्मक स्थिती निर्माण झाली आहे. साखर बाजार शंभर ते दोनशे रुपयांनी वधारला आहे. कारखानदार सध्या स्थानिक बाजारातील दराचा अंदाज घेत आहेत. या तुलनेत जागतिक बाजारात किती दर आहेत हे पाहून किती निर्यात करायची याबाबत माहिती घेण्यात येत आहे. येत्या काही महिन्यात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर व साखर उत्पादन घटण्याच्या अंदाजामुळे साखरेचे दर वाढतील असा उद्योगातील तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे साखर निर्यातीचा निर्णय विचारपूर्वक घेतला जात असल्याचे सांगण्यात आले. एफआरपी देण्यासाठी काही कारखानदार स्थानिक बाजारातही साखर विक्री करण्यासाठी धडपडत असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here