नवी दिल्ली : गव्हाच्या दराची वाढ नियंत्रित करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. यासाठी सरकारने खुल्या बाजारात गव्हाची विक्रीही केली. मात्र, गव्हाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या सहा महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २२ टक्क्यांची वाढ झाली आहे. आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवरही गव्हाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सध्याचे देशांतर्गत बाजारात गव्हाचे दर आठ महिन्यांच्या उच्चांकावर आहेत.
१७ ऑक्टोबर रोजी दिल्लीत गव्हाच्या दरात १.६ टक्क्यांची वाढ झाली. हा दर २७ हजार ३९० रुपये प्रती मेट्रिक टनावर पोहोचला असून हा दर १० फेब्रुवारीनंतरचा सर्वोच्च आहे असे रॉयटर्सच्या अहवालात म्हटले आहे. आगामी विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणूक पाहता देशांतर्गत बाजारातील दर नियंत्रणासाठी सरकार गव्हाच्या आयातीवरील शुल्क काढून टाकण्याची शक्यता आहे.
उपलब्ध माहितीनुसार, गव्हाचे नवीन पीक मार्च २०२४ नंतरच बाजारात येईल. त्यामुळे दर नियंत्रणासाठी सरकारला आपल्या कोट्यातील गहू खुल्या बाजारात आणावा लागेल. १७ ऑक्टोबर रोजी गव्हाचा सरासरी दर ३०.२९ रुपये किलो आहे. तर कमाल किंमत ५९ रुपये आहे. मे महिन्यात गव्हाचा दर २८.७४ रुपये किलो होता. गव्हाची आयात वाढवण्यासाठी आयात शुल्क रद्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे. सध्या ४० टक्के आयात शुल्क असल्याने व्यापाऱ्यांनी आयात करण्याची उत्सुकता दाखवलेली नाही.