नवी दिल्ली : गाझा पट्टीत इस्रायलच्या हल्ल्यात 724 मुलांसह किमान 2,215 लोक मारले गेले आहेत, असे हमास नियंत्रित आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सांगितले. मृतांमध्ये सुमारे 458 महिला होत्या. हल्ल्यामध्ये 8,714 लोक जखमी झाल्याचेही त्यांनी सांगितले. मागील 24 तासांत किमान 324 जणांचा मृत्यू झाल्याचे यापूर्वीच्या निवेदनात म्हटले होते.
आयडीएफने शनिवारी पुष्टी केली की, गाझामधील हमास या दहशतवादी संघटनेने 120 हून अधिक नागरिकांना ताब्यात घेतले आहे. इस्रायली लष्कराने इस्त्रायली ड्रोनवर केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर म्हणून दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या तळावर हल्ला केल्याचे सांगितले. दरम्यान, गाझामधील हजारो लोक हतबल झाले आहेत. 212 भारतीयांना बाहेर काढल्यानंतर इस्त्रायल सोडण्याची इच्छा असलेल्या दोन अर्भकांसह 235 भारतीय नागरिकांच्या दुसऱ्या तुकडीचे शुक्रवारी सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. इजिप्त, इस्रायल आणि अमेरिकेने गाझामधील परदेशी लोकांना रफाह सीमा ओलांडून इजिप्तमध्ये प्रवेश करण्यास सहमती दर्शविली आहे, असे इजिप्तच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.