कोल्हापूर : साखर कारखान्यासाठी ऊस तोडणीसाठी मजूर न पुरवता दोघा ठेकेदारांनी २३ लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा गांधीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. याबद्दल महावीर मगदूम (रा. चिंचवाड, ता. करवीर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ठेकेदार भारत पंगाने (सुक्रे वडगाव, ता. परभणी) व आनंदा मरगाळे (रा. कोहळी, ता. अथणी-बेळगाव) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत, पोलिसांनी सांगितले की, बेळगाव जिल्ह्यातील सौंदती येथील साखर कारखान्यासाठी भारत पंगाने याने २० मजूर पुरविण्याचा करार करून १५ लाख ५० हजार रुपये उचलले. तर दुसऱ्या ठेकेदारानेही २० मजूर पुरवण्यासाठी २० लाखांची उचल केली. यातील नऊ लाख रुपये परत केलेले नाहीत. दोघा ठेकेदारांनी २३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे म्हटले आहे. संशयित पंगाने याने मुनोळी येथील रेणुका शुगर कारखान्याला मजूर पुरवठ्याचा करार केला होता. मात्र, मजूर पाठवले नाहीत. आनंदा मरगाळे याने २० मजूर पुरवण्याचा करार करून २० लाख रुपये उचलले. त्यातील १२ लाखांची वसुली झाली. तर आठ लाख रुपये येणे-बाकी आहे.