नवी दिल्ली : केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करण्याचे धोरण राबविल्याने २०२२- २३ या एका वर्षात ५०९ कोटी लिटर पेट्रोलची बचत झाली आहे. त्यामुळे देशाचे २४ हजार ३०० कोटी रुपयांचे परकीय चलन वाचले आहे, अशी माहिती, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली. केंद्र सरकारने तेल आयातीवरील अवलंबित्व कमी करणे, परकीय चलनाची बचत, देशांतर्गत कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी इथेनॉलमिश्रित पेट्रोल (ईबीपी) कार्यक्रम राबवला आहे.
याबाबत मंत्री रामेश्वर तेली यांनी सांगितले की, इथेनॉलच्या मिश्रणामुळे सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी एका वर्षात सुमारे ५०९ कोटी लिटर पेट्रोलची बचत केली. त्यामुळे २४,३०० कोटी रुपयांचे परकीय चलन वाचले आहे. शेतकऱ्यांना १९,३०० कोटी रुपये मिळाले. इथेनॉल उत्पादन वाढीसाठी सरकारने व्याजमाफी योजनेंतर्गत १,२१२ प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यात मोलासेस आधारित ५९०, धान्य आधारित ४७४ आणि दुहेरी फीड आधारित १४८ प्रकल्पांचा समावेश आहे.