नंदुरबार : नंदुरबारसारख्या दुर्गम जिल्ह्यात कार्यरत आयान साखर कारखान्याने गेल्या हंगामात गाळपास आलेल्या दुसरा हप्ता सरसकट १०० रुपये प्रतीटन याप्रमाणे दिवाळीपूर्वी १० कोटी ६१ लाख अदा करण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्याने हंगाम २०२२-२३ मध्ये गळितास आलेल्या उसाला पहिला हप्ता प्रतिटन २,३५० रुपये दिले आहेत. ऊसाचा हा दर एफआरपीपेक्षा ८५ रुपये प्रतिटन जास्त आहे.
आयान कारखान्याचे संचालक सचिन एस. सिनगारे यांनी सांगितले की, भागातील इतर कारखान्यांपेक्षा आम्ही १०० ते १२५ रुपये जास्त दर दिला आहे. आयान शुगरचा अंतिम ऊस दर दोन हजार ४५० रुपये प्रतिटन मिळणार आहे. कारखान्याने गेल्या १२ वर्षांतील गाळपाचे सर्व रेकॉर्ड मोडून कमी दिवसात नोंद-बिगर नोंद उसाचे जास्तीत जास्त गाळप करून नवा विक्रम केला आहे.
संचालक सिनगारे म्हणाले की, कारखान्याने दोन वर्षांपूर्वी अतिरिक्त ऊस असताना संपूर्ण उसाचे गाळप करून शेतकऱ्यांना शासनाकडून २०० रुपये सबसिडी येण्यापूर्वी शेतकऱ्यांना अदा केली होती. कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार आणि त्यावर आधारित शेकडो व्यावसायिकांच्या हाताला रोजगारही मिळाला आहे. कारखान्याने उसाच्या व्हरायटीत बदल केला असून, चांगल्या प्रतीचे बियाणे, प्रेसमड उधारीने उपलब्ध करून दिले आहे. सुधारित बियाणे पट्टा पद्धतीने लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त केले जात आहे.