सोलापूर : कुमठे हद्दीतील होटगी रोड विमान तळाशेजारी असलेल्या ४७ एकर ३६ गुंठे जमिनीपैकी २५ एकर १ गुंठा जमीन ही सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची, तर २२ एकर २२ गुंठे जमीन ही विमानतळ प्राधिकरणाची असल्याचा निकाल प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांनी दिला आहे. विमान तळाशेजारी असलेल्या जागेची मालकी कोणाची, याबाबत गेल्या अनेक वर्षापासून वाद प्रलंबित होता. विमान प्राधिकरणाने सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीचे ७/१२ उताऱ्यावर त्यांच्या नावाची नोंद करवून घेतलेली होती. त्याबाबत साखर कारखान्याने विमान प्राधिकरणाविरुध्द महसूल अधिकाऱ्यांपुढे अपील दाखल केले. हा वाद प्रांताधिकारी पडदुणे यांच्या निर्णयाने निकाली निघाला आहे.
मूळ मालकाची जमीन १३ गुंठे इतकीच असल्याचे निकालात म्हटले आहे.विमान तळाशेजारील जागेसंदर्भात सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्यावतीने उत्तर सोलापूरचे तहसीलदार व विमानतळ प्राधिकरण यांच्यासह खासगी व्यक्तीच्या विरोधात अपील दाखल करण्यात आले होते. सदरचे अपील फेटाळल्यामुळे साखर कारखान्याने त्या निर्णयाविरुध्द अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्याकडे दाद मागितली. त्यानंतर ठोंबरे यांनी हा विषय प्रांताधिकारी पडदुणे यांच्याकडे सोपविला. त्यानुसार पडदुणे यांनी यावर सुनावणी घेऊन अपिलार्थी यांचे विधिज्ञ नीलेश अ. ठोकडे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन हा वाद निकाली काढला आहे. या प्रकरणामध्ये अपेलंट यांच्यातर्फे अॅड. नीलेश अ. ठोकडे, अॅड. सोमनाथ साखरे, अॅड. यशराज गडदे, अॅड. सादिक शेख यांनी काम पाहिले.