नवी दिल्ली : केंद्रीय अन्न मंत्रालयाने २६ मार्च रोजी एका अधिसूचनेनुसार, एप्रिल २०२४ साठी २५ लाख मेट्रिक टन (LMT) मासिक साखर कोटा जारी केला आहे. हा मासिक कोटा एप्रिल २०२३ (२२ LMT) मध्ये मंजूर केलेल्या कोट्यापेक्षा ३ लाख मेट्रिक टन ने जास्त आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच मार्च २०२४ मध्ये केंद्राने देशांतर्गत साखर विक्रीसाठी २३.५ लाख मेट्रिक टन कोटा वाटप केला होता.
दरम्यान, साखर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, लोकसभा निवडणूक जवळ असल्याने एप्रिल २०२३च्या तुलनेत साखर विक्री कोटा ३ लाख टन जादा देण्यात आला आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेवर दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे. परिणामी साखरेच्या दरात प्रती क्विंटल ३० ते ४० रुपयांनी घसरण होण्याची शक्यता आहे. आज महाराष्ट्रात एस-ग्रेड साखर ३,४०० ते ३,४३० रुपये प्रती क्विंटल, तर उत्तर प्रदेशात एम-ग्रेड साखर ३,७७० ते ३,८०० रुपयांच्या दरम्यान व्यवहार करीत आहे.