अन्न मंत्रालयाने सप्टेंबर २०२३ साठी साखर कारखानदारांना २५ LMT (लाख मेट्रिक टन) मासिक साखर कोटा मंजूर केला आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये मंजूर करण्यात आलेल्या कोट्यापेक्षा हा १.५० LMT जास्त आहे. सप्टेंबरचा कोटा गेल्या महिन्यातील देशांतर्गत कोट्यापेक्षा ५०,००० मेट्रिक टनाने कमी आहे.
ऑगस्ट २०२३ या महिन्यासाठी सरकारने अतिरिक्त २ LMT कोटा मंजूर केला होता. त्यामुळे एकूण कोटी २५.५० LMT झाला होता.
बाजारातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आगामी सणासुदीच्या काळात साखरेची मजबूत मागणी पाहता साखर कारखान्यांना साखरेचा उच्च कोटा देण्यात आला आहे. या जादा कोट्यामुळे साखरेच्या किमती नियंत्रणात राहतील.
सणांसुदीच्या हंगामाआधी सरकार साखर आणि इतर वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी पावले उचलत आहे. देशातील नागरिकांना जादा दराचा सामना करावा लागू नये यासाठी सरकार सक्रीय आहे. आज सरकारने घरगुती गॅसच्या किमतीमध्येही मोठ्या कपातीची घोषणा केली आहे. ३० ऑगस्ट २०२३ पासून देशातील सर्व बाजारात १४.२ किलोच्या सिलिंडरची किंमत ११०३ रुपयांवरून घटून ९०३ रुपये प्रती सिलिंडर होईल.
ही कपात पीएमयूवाय कुटूंबांना २०० रुपये प्रती सिलिंडरच्या सध्याच्या अनुदानापेक्षा अतिरिक्त आहे. त्यामुळे पीएमयूवाय कुटूंबांना या कपातीनंतर दिल्लीत ७०३ रुपये प्रती सिलिंडर पैसे मोजावे लागतील.