कोल्हापूर : अथणी शुगर्स लिमिटेडच्या शाहूवाडी युनिटने चालू गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये गेल्या ६६ दिवसांत २ लाख ५५ हजार ३७० मे. टन गाळप केले आहे. कारखान्याने सरासरी ११.३० टक्के साखर उताऱ्याने २ लाख ६७ हजार ६६० क्विंटल साखर उत्पादन केले आहे. एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर योगेश पाटील यांनी ही माहिती दिली. कारखाना दैनंदिन ५५०० मे. टन. ऊस गाळप करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर योगेश पाटील म्हणाले की, कारखान्याने ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत गाळपासाठी आलेल्या सर्व ऊसाची बिले दिली आहेत. उत्पादक शेतकऱ्यांना प्रती टन ३,२०० रुपये दिले आहेत. ऊस तोडणी, वाहतुकीची बिलेही वेळेत देण्याची परंपरा अथणी शुगर्सकडून जोपासली गेली आहे. कारखान्याने यंदा ६ लाख मे. टन. गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. शेतकऱ्यांनी या गळीत हंगामात जास्तीत जास्त ऊस पुरवठा करुन उद्दिष्ट पूर्तीसाठी सहकार्य करावे. यावेळी सर्व संचालक, कार्यकारी संचालक श्रीनिवास पाटील, युनिट हेड रविंद्र देशमुख आदी उपस्थित होते.