पुणे : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रती टन ३०० रुपये अंतिम हप्ता बुधवारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला आहे. एकूण २७ कोटी ५० लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली. कारखान्याचे संस्थापक-संचालक व सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वार्षिक सभेत शेतकऱ्यांना शब्द दिला होता. गव्हाण पूजन कार्यक्रमातही दिलेल्या आश्वासनानुसार हे पैसे जमा करण्यात आल्याने शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बेंडे यांनी सांगितले की, गेल्यावर्षी कारखान्याने नऊ लाख १९ हजार ९८३ मेट्रिक टन ऊस गाळप केला. त्यानुसार, कारखान्याने एफआरपी नुसार दर दिला आहे. शेतकऱ्यांना ३१०० रुपये मे. टन दर दिला असून भाग विकास निधी कपात करून उर्वरित ३०० रुपये टनाप्रमाणे २७ कोटी ५० लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे. डिस्टीलरी प्रकल्प कार्यान्वित झालेला नसतानाही कारखान्याने चांगला ऊस दर दिला आहे. कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी सांगितले की, कारखान्याने एफआरपीपेक्षा वाढीव रक्कम ३५० रुपये टन असा दर अंतिम हप्त्याच्या रुपात दिला आहे. कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी भीमाशंकर कारखान्यास ऊस द्यावा असे आवाहन वळसे-पाटील यांनी केले.