नवी दिल्ली : केंद्रीय अन्न मंत्रालयाने २६ एप्रिल रोजी केलेल्या एका घोषणेनुसार, मे २०२४ साठी २७ लाख मेट्रिक टन (LMT) मासिक साखर कोट्याचे वाटप केले आहे. मे २०२३ मध्ये मंजूर केलेल्या २४ LMT कोट्यापेक्षा हे प्रमाण तब्बल ३ LMT ने जास्त आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच एप्रिल २०२४ मध्ये देशांतर्गत विक्रीसाठी साखरेचा कोटा २५ LMT होता.
बाजारातील तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यातील मागणीमुळे देशांतर्गत बाजारपेठेसाठी २७ एलएमटी साखरेचा कोटा पुरेसा असेल. यामुळे बाजार सकारात्मक राहण्याची अपेक्षा आहे. सध्या देशातील अनेक भागात वाढत्या उष्णतेमुळे साखरेची बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन हा जास्त कोटा उपलब्ध करून देण्यात आला आहे. सामान्यतः उन्हाळ्याच्या महिन्यात लोक जास्त आइस्क्रीम, गोड पेये इत्यादींकडे वळतात. त्यामुळे साखरेचा वापर वाढतो. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी सांगितले की, पुढील ५ दिवसांत भारताच्या पूर्व आणि दक्षिण द्वीपकल्पात उष्णतेची लाट ते तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.