पुणे : थेऊर सहकारी साखर कारखान्याला सुमारे १५ वर्षांनंतर नवीन अध्यक्ष लाभणार आहे. बुधवारी (दि. २७) कारखाना कार्यस्थळावर अध्यक्ष व उपाध्यक्षपदांची निवडणूक होणार आहे. पीठासीन अधिकारी शीतल पाटील यांनी नवनियुक्त संचालक मंडळाची बैठक बोलावली आहे. जवळपास पंधरा वर्षांनी झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांनी धक्कादायक निकालाची नोंद करीत कारखान्याची सूत्रे नवीन दमाच्या संचालकांच्या हाती सोपवली.
कारखान्याच्या निवडणुकीत बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जगताप, कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखाली अण्णासाहेब मगर विकास आघाडीने वर्चस्व गाजवून २१ पैकी १८ जागांवर विजय संपादन केला होता. या सत्ताधारी गटाच्या संचालक मंडळात पॅनेलप्रमुख प्रकाश जगताप यांचे बंधू व माजी संचालक सुभाष जगताप हे अध्यक्षपदासाठी प्रमुख दावेदार आहेत. कारखान्यासाठी सतत संघर्ष केलेले माजी संचालक पांडुरंग काळे यांचे चिरंजीव मोरेश्वर काळे हेसुद्धा शर्यतीत असतील. कारखान्यावर गेली १३ वर्षे प्रशासकीय समितीची राजवट होती. आता लोकनियुक्त संचालक मंडळ नियुक्त झाल्याने प्रशासकीय कामकाजाला गती मिळण्यास मदत मिळणार आहे.