सोलापूर : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं. १ पिंपळनेर व आ. बबनराव शिंदे युनिट नं. २ करकंब कारखान्यातर्फे ३१ जानेवारीअखेर ऊसतोडणी वाहतूक बिले वाहनमालकांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहेत. कारखान्याने १ ते १० फेब्रुवारी दरम्यान गळीतास आलेल्या उसाचे अनुदानासह प्रतिटन रु.२८०० प्रमाणे ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष, आमदार बबनराव शिंदे यांनी ही माहिती दिली.
आमदार शिंदे म्हणाले की, कारखान्याने १ ते २८ फेब्रुवारी दरम्यान गाळपास येणाऱ्या उसास अनुदानासह प्रति रु. २८०० व १ मार्चपासून पुढे गाळपास येणाऱ्या उसास प्रतिटन रु. २८५० प्रमाणे उत्तेजनार्थ वाढीव ऊस दर सर्व ऊस पुरवठादार सभासदांना मिळणार आहे. पिंपळनेर युनिटने आजअखेर १३ लाख तीन हजार ५५६ मे. टन व युनिट नं. २ येथे आजअखेर चार लाख ५१ हजार ५४२ मे. टन ऊस गाळप झाले आहे. दोन्ही युनिटचे मिळून आजअखेर १७ लाख ५५ हजार ९८ मे. टन उसाचे गाळप झाले आहे. सभासद व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे युनिट नं. १ पिंपळनेर व युनिट नं. २ करकंब या कारखान्यास पुरवठा करुन सहकार्य करावे, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष आ. बबनराव शिंदे यांनी केले. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक, जनरल मॅनेजर व सर्व अधिकारी उपस्थित होते.