सोलापूर : यंदा सोलापूर जिल्ह्यातील ३४, तर धाराशिव जिल्ह्यातील १४ अशा एकूण ४८ कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यातील ३४ कारखान्यांनी एफआरपीचे १,६१८ कोटी व धाराशिव जिल्ह्यातील १४ कारखान्यांनी ४०३.१२ कोटी असे एकूण २,०२० कोटी रुपये आतापर्यंत शेतकऱ्यांना दिले आहेत. तर विभागातील ३२ साखर कारखान्यांकडे १५ जानेवारीअखेर २८७.४७ कोटी रुपये एफआरपी थकीत आहे. यात आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या सहा कारखान्यांचाही समावेश आहे.
विभागात सोलापूर व धाराशिव जिल्हे समाविष्ट आहेत. सोलापुरातील २३ कारखान्यांकडे २२९.४९ कोटी तर धाराशिवमधील ९ कारखान्यांकडे एफआरपीचे ५७.९८ कोटी रुपये थकित आहेत. माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांच्याशी संबंधित कारखान्यांचे एफआरपीचे १६.८५ कोटी तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कारखान्यांकडे १०.२१ कोटी रुपये थकित आहेत. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याशी संबंधित सर्वाधिक सहा कारखान्यांकडे ८० कोटी रुपये एफआरपी थकीत आहे.