पोंडा: धारबंदोरा येथील संजीवनी साखर कारखान्यात वारंवार चोरी होत होती. शनिवारी रात्री जेव्हा आरोपींनी कारखान्यात पुन्हा चोरीचा प्रयत्न केला, तेव्हा कारखान्यातील कामगारांनी चोरी करणार्या तीन आरोपींना पकडले. कारखान्यात होणार्या सततच्या चोरीमुळे येथील कामगार जागरुक होते. अखेर कारखान्याच्या आवारात आरोपींना चोरीसाठी वापरलेल्या साधनांसह रंगेहात पडकण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली. रविवारी चोरीचा मुख्य सूत्रधार असलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यात सामील असलेल्या बलेनो कार ही पोलिसांनी जप्त केली आहे.
शनिवारी रात्री 11.30 च्या सुमारास तीन लोक कटिंग साधनांसह कारखान्यात आले. कारखाना आवारात प्रवेश करताच कामगारांनी त्यांना पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.
कृष्णा इंगळे (वय 35, रा. अप्पर बाजार पोंडा) असे मुख्य आरोपीचे नाव आहे. तर राजेश गुप्ता (45), सुनील गणाचारी (30) रा. सेंट अॅन चर्च पोंडा, सुरेश यादव (वय 40) रा. कोपरवाडा पोंडा हे इतर आरोपी आहेत.
पोलिसांनी चारही आरोपींवर कलम 454, 457, 380 अन्वये आणि आयपीसीच्या 34 सह गुन्हा दाखल केला असून, त्यांना रविवारी अटक केली आहे.
संजीवनी साखर कारखाना येथे गेल्या 15 दिवसांत चोरीच्या दोन घटना घडल्या असून तेथे 3 लाखाहून अधिक किंमतीचे साहित्य चोरीला गेले आहे. आतापर्यंत पोलिसांनी आरोपींकडून कोणतेही साहित्य जप्त केले नाही.
चोरीच्या प्रकरणात पोलिसांना आणखी काही संशय असून पुढील तपास सुरू आहे. पीएसआय अजित उमरी हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.