अहिल्यानगर (अहमदनगर) : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात ३ लाख ३४ हजार ८९७ मे. टन ऊस गाळप केले आहे. एकूण २ लाख ८४ हजार २०० क्विंटल साखर पोत्यांची निर्मिती केली आहे. हंगामाची सोमवार (दि. १८) सांगता करण्यात आली. कारखान्याचे माजी अध्यक्ष ॲड. प्रतापराव ढाकणे तसेच विद्यमान अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने हंगाम यशस्वी केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनकुमार घोळवे यांनी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनकुमार घोळवे यांनी सांगितले की, पुढील गाळप हंगाम सर्वांसाठी आव्हानात्मक असेल. त्यासाठी सर्वांनी जोमाने काम करावे. कारखान्याचे माजी उपाध्यक्ष डॉ. प्रकाश घनवट यांचे भाषण झाले. ज्येष्ठ संचालक त्रिंबक चेमटे, सदाशिव दराडे, रणजीत घुगे, विजयसिंह सवणे, त्रिंबकराव करोडकर, प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे, प्रशासकीय अधिकारी पोपटराव केदार, चीफ अकौंटंट तीर्थराज घुंगरड, चिफ इंजि. प्रविण काळुसे, चीफ केमिस्ट पुंडलिक सांगळे, शेती अधिकारी अभिमन्यू विखे ऊस विकास अधिकारी सचिन राऊत, सुपरवायझर किसन पोपळे लीगल ऑफिसर शरद सोनवणे, पर्चेस ऑफिसर तुकाराम वारे आदी उपस्थित होते.