पुणे : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने सन २०२४- २०२५ या गळीत हंगामामध्ये ३ लाख ६४ हजार टन ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण केला. श्री छत्रपती कारखान्याचा गळीत हंगामास २० नोव्हेंबर रोजी सुरुवात झाली आहे. गाळपाचा ५७ वा दिवस पूर्ण झाला आहे. कारखान्याने आतापर्यंत ३ लाख ६४ हजार ५५ टन उसाच्या गाळपाचा टप्पा पूर्ण केला आहे. तसेच गाळप झालेल्या उसाला सरासरी साखरेचा उतारा १०.३१ टक्के मिळाला असून, ३ लाख ६६ हजार २०० क्विंटल साखरेची निर्मिती झाली आहे.
सहवीज निर्मिती प्रकल्पातून १ कोटी ९० लाख ९७ हजार ९०० युनिट वीजनिर्मिती झाली आहे. कारखान्याने ६६ लाख ९५ हजार ९०० युनिटचा अंतर्गत वापर केला असून, १ कोटी २४ लाख विजेची निर्यात केली आहे. तसेच १५ डिसेंबरपर्यंत गाळप झालेल्या सभासदांच्या खात्यावर २८०० रुपये प्रतिटनाप्रमाणे पहिला हप्ता जमा करण्यात आला आहे. तसेच, १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत गाळप झालेला उसाचा हप्ता २४ ते २७ जानेवारी रोजी जमा होणार आहे. १ जानेवारी ते १५ जानेवारीपर्यंत गाळप झालेल्या उसाचा हप्ता १० फेब्रुवारी रोजी जमा होणार आहे. हंगामातील अंतिम साखर उतारा व साखरेचे दर विचारात घेऊन अंतिम ऊस दरही जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न राहणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे व उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी दिली.