सातारा : किसन वीर आणि खंडाळा कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सोसायटी कर्ज खात्यावर ३० कोटी रुपये जमा केले आहेत. किसन वीर व खंडाळा कारखान्यात पाच लाख ५८ हजार ३०४ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले होते. दोन्ही कारखान्यांच्या शेतकऱ्यांच्या नावावर सोसायटीचे कर्ज होते. त्या कर्जाच्या व्याजाची ३० कोटी रुपयांची रक्कम कारखान्याने संबंधितांच्या नावे वर्ग केली. त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन कर्ज घेणे शक्य होणार आहे, अशी माहिती किसन वीर कारखान्याचे व्हाइस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी दिली आहे.
व्हाईस चेअरमन शिंदे म्हणाले की, कारखाना साखर विक्री करूनच शेतकऱ्यांना ऊस बिले द्यावी लागत आहेत. सध्या बाजारपेठेत साखरेचे भाव ३३.५० रुपयांवर आले आहे. त्यामध्ये ऊस बिल देऊन इतर खर्चामुळे कारखाना तोट्यात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे संचालक मंडळाने साखर विक्री थांबवली आहे. लवकरच साखरेचे भाव वाढतील. त्यावेळी शेतकऱ्यांची सर्व ऊस बिले त्यांच्या बँक खात्यांवर जमा केली जातील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने दोन्ही कारखान्यांना थकहमी मंजूर झाली आहे. त्यामुळे दोन्ही कारखान्यांच्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे असे त्यांनी सांगितले.