सांगली : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर वापर केल्यास उसाचे एकरी ३० टक्क्यांपेक्षा जास्त उत्पादन वाढविणे शक्य आहे. यासाठी राजारामबापू कारखाना पूर्ण सहकार्य करेल, असे प्रतिपादन माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी केले. राजारामबापू साखर कारखाना, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट (केव्हीके) बारामती व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) पुणे यांच्यावतीने कारखाना कार्यस्थळावर आयोजित शेतकरी चर्चासत्रात आ. पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ते बोलत होते. आमदार जयंत पाटील यांची ‘व्हीएसआय’च्या एआय तंत्रज्ञान कृती गटाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा माजी जि. प. उपाध्यक्ष रणजित पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील, व्हीएसआयचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अशोक कडलग (पुणे), केव्हीकेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विवेक भोईटे (बारामती), ओंकार ढोबळे, ऊस विकास समितीचे अध्यक्ष अमरसिंह साळुंखे, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील, ऊस विकास अधिकारी सुजयकुमार पाटील उपस्थित होते. आमदार पाटील म्हणाले की, नव्या तंत्राने उत्पादनात वाढ होऊन दुसऱ्या बाजूला पाणी, खतात बचत होते, जमिनीची सुपीकता टिकून राहते. आपण प्रगतशील शेतकरी म्हणून उसाचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर सुरू करावा. रामती येथे ऊस शेतीत एआय तंत्रज्ञानाचा वापर करून एकरी उत्पादन वाढते, हे सिद्ध झाले आहे. यावेळी ऊस विकास अधिकारी सुजयकुमार पाटील यांनी स्वागत केले. अमरसिंह साळुंखे यांनी आभार मानले. विनायक पाटील, विश्वासराव पाटील, शशिकांत पाटील, शिवाजीराव साळुंखे, संग्राम फडतरे, विठ्ठल पाटील, प्रदीपकुमार पाटील, श्रेणीक कबाडे, रघुनाथ जाधव, बबनराव थोटे आदी उपस्थित होते.