सातारा : यंदा पावसाने दडी मारल्याने सातारा जिल्ह्यात उसाच्या उत्पादनात तब्बल ३० ते ४० टक्क्यांची घट झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. उसाला दर कमी मिळण्याची शक्यता असल्याने खर्च भागणार कसा, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी साखर कारखान्यांनी चांगला दर द्यावा, त्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होऊ लागली आहे.
उसाला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत येत आहे. यंदा तर पाऊस कमी झाल्याने उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक गणित बिघडले आहेत. पाऊस अत्यंत कमी झाल्यामुळे यंदा ऊस उत्पादनात सुमारे ३० ते ४० टक्क्यांनी घट झाली आहे. खतांचे दर वाढत आहेत. मजुरांचे दर वाढले आहेत. महागाई वाढते आहे. मात्र, त्या प्रमाणात ऊस दरात वाढ झाली नाही. शेतकऱ्यांना ऊस उत्पादनासाठी घातलेला खर्चही निघणार नाही. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून कर्जमाफी करावी, अशी मागणी होत आहे.