लातूर : लातूर जिल्ह्यात ऊस कमी झाल्याने तीन साखर कारखान्यांचे गाळप संपुष्टात आले आहे. जिल्ह्यातील ११ साखर कारखान्यांनी आतापर्यंत ३१ लाख ५८ हजार टन उसाचे गाळप करून २९ लाख ३६ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. ऊस गाळपामध्ये खासगी कारखान्यांची आघाडी आहे, तर उताऱ्यात मात्र सहकारी साखर कारखाने पुढे आहेत. सरासरी साखर उतारा ९.३ टक्के इतका आहे. सद्यस्थितीत मांजरा, रेणा आणि ‘किल्लारी’ हे तीन कारखाने बंद झाले आहेत. तर ऊस कमी असल्याने या महिन्याच्या अखेर बहुतांश कारखाने बंद होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात सहा सहकारी व पाच खासगी असे ११ साखर कारखाने आहेत. सहकारी साखर कारखान्यांनी १४,३२,२०१ टन उसाचे गाळप करून १४,८०,६१५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा १०.३४ टक्के आहे. तर पाच खासगी कारखान्यांनी १७,२५,८८९ टन उसाचे गाळप करून १४,५६,२३० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. त्यांचा उतारा ८.४४ टक्के आहे. विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम संपुष्टात आला आहे. कारखान्याने ३,१६,५०० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. बंद झालेल्या किल्लारी शेतकरी सहकारी साखर कारखान्याने ८,४२५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. तर, रेणा सहकारी साखर कारखान्याने २,७१,२०० क्विंटल साखर उत्पादन घेऊन हंगामाची समाप्ती केली.