कोल्हापूर : गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी कारखान्याच्यावतीने प्रती टन ३१५० रुपये पहिली उचल देण्याची घोषणा करत उच्चांकी ऊस दराची परंपरा कायम राखली. गळीत हंगाम २०२४- २५ मध्ये कारखान्याकडे गाळपास येणाऱ्या उसाला ही उचल विनाकपात देईल. हंगाम समाप्तीनंतर एफआरपीनुसार जो दर निघेल, तो शेतकऱ्यांना देण्यास गुरुदत्त शुगर्स बांधील आहे असे त्यांनी स्पष्ट केले. घाटगे यांनी दर जाहीर करून ऊस हंगामातील कोंडी फोडली आहे.
शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी शुक्रवारी कारखाना लवकर सुरू करावा, अशी विनंती कारखाना व्यवस्थापनाला केली होती. त्याची दखल घेत चेअरमन घाटगे यांनी प्रतिटन ३१५० रुपये पहिली उचल विनाकपात जाहीर करून शनिवारपासून ऊस तोडणी सुरू होत असल्याचे जाहीर केले. कारखान्याने शेतकऱ्यांना त्यांच्या कुटुंबीयांचा आरोग्याचा विचार करून अंतिम टप्प्यात ऊस पुरवणाऱ्या शेतकऱ्यांना ‘किसान कार्ड’ योजना सुरू केली आहे. हंगामात सर्व शेतकऱ्यांनी आपला ऊस गाळपास गुरुदत्त कारखान्यास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन घाटगे यांनी केले. एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे, रामचंद्र डांगे, दिलीप माणगावे, संचालक शिवाजीराव माने-देशमुख, बबन चौगुले, आण्णासाहेब पवार, शिवाजी सांगले व तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.