सांगली : शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत तासगाव कारखाना प्रशासनाने एफआरपीपेक्षा जास्त म्हणजे ३१५० रुपयेप्रमाणे दर देण्याचे जाहीर केला आहे. कारखान्याचे सर्वेसर्वा, खासदार संजय पाटील यांनी ही माहिती दिली. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्याच्यादृष्टीने एफआरपी ३००० पेक्षा कमी असतानाही आम्ही हा निर्णय घेतला आहे. सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर दहा दिवसात पेमेंट जमा होईल. यापूर्वी ऊस दिलेल्या व यापुढील देणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना हा दर लागू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
खासदार संजय पाटील म्हणाले की, यावर्षी चार लाख टनापेक्षा जास्त उसाचे गाळप करण्याचे कारखाना प्रशासनाचे नियोजन आहे. पुढीलवर्षी आम्ही कारखान्याची गाळप क्षमता वाढवत आहोत. जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना न्याय देता येईल. अत्यंत अडचणीच्या काळात तासगाव कारखाना आम्ही सुरू केला आहे. अचूक काटा हे कारखान्याचे वैशिष्ट्य आम्ही कायम ठेवले आहे. यावर्षी उसाचे टनेज कमी भरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा तोटा भरून काढण्यासाठी जादा दर दिला जात आहे.