सोलापूर जिल्ह्यातील एका गावात १५ दिवसांत ३२ एकरातील ऊस जळून खाक, घातपाताचा संशय

सोलापूर : माळशिरस तालुक्यातील कण्हेर गावात गेल्या १५ दिवसांत एकापाठोपाठ एक ३२ एकरांतील ऊस पिक आगीत भस्मसात झाले आहे. विधानसभा निवडणुकीचे मतदान झाले त्यादिवशी हा पहिला उसाचा फड पेटला आणि पाहता-पाहता ऊस भस्मसात झाला. त्यानंतर सातत्याने एका पाठोपाठ एक असे जवळपास 30 ते 35 उसाचे फड आगीत भस्मसात झाले आहेत. उसाचे फड पेटवण्यामागे राजकीय सुडबुद्धी असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गावाला यातून तातडीने दिलासा देण्याची मागणी येथील ग्रामस्थ करू लागले आहेत.

आग लागलेले उसाचे फड तोडणीला आलेले किंवा काही ठिकाणी तर उसाची तोडणी सुरू असणारे आहेत. पहिल्यांदा ऊस पेटल्यानंतर ग्रामस्थांनी प्रत्येक फडाच्या चारी बाजूने दिवस रात्र पहारा ठेवण्यास सुरुवात केली. मात्र पहारा असतानाही अचानक मधूनच उसाला आग लागायची आणि उसाचा फड भस्मसात होत आहे. ऐन तोडणीच्या काळात सुरु झालेल्या या घटनेमुळे येथील शेतकरी पार उध्वस्त झाला आहे. उसाला लागलेली आग रोखताना अनेक जण जखमी झाले आहेत. चारही बाजूंनी पहारा ठेवल्यावरही ऊस कसा पेटतो कि कोणी पेटवतो हेच समाजत नसल्याचे शेतकरी धनाजी माने यांनी सांगितले. त्यांचा चार एकर ऊस जळून गेला आहे. या प्रकाराबाबत पोलिस पाटील नितीन यांनाही शंका असून रोज आम्ही पहारा ठेवूनदेखील ऊस जाळण्याचा प्रकार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. रुपा बोडरे यांचा एक एकर ऊस जळाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दखल घेऊन उसाला आग कशी लागते किंवा लावली जाते याचा शोध घेण्याच्या सूचना माळशिरसाचे नूतन आमदार उत्तम जानकर यांनी प्रशासनाला दिले आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी गावाला भेट देऊन याची माहिती घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here