नांदेड : यंदाच्या गळीत हंगामात नांदेड विभागात २८ साखर कारखाने गाळप करीत असून या कारखान्यांनी शुक्रवारअखेर ३२,४७,९११ टन उसाचे गाळप आणि २७,३२,८२५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यांतून यंदाच्या गाळप हंगामासाठी ३० कारखान्यांनी नांदेड प्रादेशिक साखर सहसंचालक विभागाकडे अर्ज केले होते. यापैकी २९ कारखान्यांना गाळप परवाना मिळाला असून २८ कारखान्यांनी गाळप सुरू केले. त्यात १९ खासगी तर ९ सहकारी साखर कारखाने गाळप करीत आहेत.
विभागाचा सरासरी साखर उतारा ८.९१ टक्के आहे. विभागात लातूर जिल्ह्यात सर्वाधिक दहा साखर कारखाने सुरू झाले आहेत. परभणी जिल्ह्यात सात कारखाने सुरू आहेत. नांदेड जिल्ह्यात सहा कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. हिंगोली जिल्ह्यात दोन खासगी, तीन सहकारी कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. गेल्या काही वर्षांपासून परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शुगर ॲड एनर्जी लि., माखणी हा कारखाना गाळपात आघाडीवर असतो. यंदाही कारखान्याने आघाडी कायम ठेवत सर्वाधिक २,७५,००० टन उसाचे गाळप केले आहे. जिल्ह्यातीलच ट्वेंटीवन शुगर लि., सायखेडा सोनपेठ कारखान्याने २,३६,००० टन उसाचे गाळप केले आहे.