कोल्हापूर : आसुर्ले पोर्ले (ता. पन्हाळा) येथील श्री दत्त दालमिया भारत शुगर कारखान्याच्या ऊस दरप्रश्नी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. कारखान्याचे युनिट हेड एस. रंगाप्रसाद आणि जिल्हाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर चालूवर्षी गाळप होणाऱ्या उसाला कारखाना एकरकमी एफआरपी ३,३०० रुपये देणार असल्याचे जाहीर करण्यात आले. संघटनेच्या मागणीनुसार ऊस दर ३,३८४ रुपये होतो. उर्वरित ८४ रुपये जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चेने दिले जातील, असे रंगाप्रसाद यांनी जाहीर केले.
कारखान्याच्या कार्यस्थळावर मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एफआरपी अधिक १०० रुपये मागणीसाठी काटा बंद पाडत ठिय्या आंदोलन सुरू केले होते. माजी खासदार राजू शेट्टी यांनी कारखान्याचा निर्णय झाल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात येत असल्याचे जाहीर केले. यावेळी जालिंदर पाटील, सागर शंभुशेटे, सावकर मादनाईक, भीमगोंड पाटील, स्वस्तिक पाटील, विठ्ठल मोरे आदी उपस्थित होते.