भारतात गेल्या काही वर्षांपासून मद्य विक्री आणि वापर सातत्याने वाढला आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारतातील लोकांनी एक नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. अल्कोहल इंडस्ट्रीजची संघटना कन्फेडरेशन ऑफ इंडियन अल्कोहलिक बेवरेज कंपनीज (CIABC)ने ताजी आकडेवारी जारी केली आहे.
एबीपी लाइव्हमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये भारतात विदेशी मद्य म्हणजे आयएमएफएल विक्रीत १४ टक्क्यांची वाढ होवून ती ३८.५ कोटी पेटीपर्यंत पोहोचली आहे असे सीआयएबीसीच्या आकडेवारीनुसार दिसून येते. एका पेटीत नऊ लिटर मद्य असते. अशा प्रकारे भारतीयांनी गेल्या आर्थिक वर्षात ३५० कोटी लिटर मद्य खरेदी केली आहे. कोणत्याही एका आर्थिक वर्षात झालेली ही सर्वाधिक विक्री आहे. कोविड आकडेवारीपूर्वीच्या, २०१९-२० च्या तुलनेत हा आकडा १२ टक्क्यांनी जास्त आहे.
प्रीमियम विभागात सर्वाधिक विक्री झाली आहे. या कॅटॅगिरीत १००० रुपये प्रती ७५० मिली या पेक्षा अधिक किमतीचे मद्य असते. तर ५०० ते १००० रुपये प्रती ७५० मिली या कॅटेगिरीत घट होवून ते प्रमाण २० टक्क्यांवर आले आहे. स्वस्त मद्यविक्री ७९ टक्के आहे. यावर्षीही अशीच स्थिती कायम राहील अशी शक्यता सीआयएबीसीने व्यक्त केली आहे. यंदाच्या मद्य विक्रीत आठ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. हे प्रमाण ३८० कोटी लिटरपर्यंत पोहोचेल. दक्षिणेतील राज्यांमध्ये मद्य विक्री अधिक वाढल्याचे दिसले आहे.