कोल्हापूर : शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर पालकमंत्री हसन मुश्रीफ, आ. सतेज पाटील, आ. पी. एन. पाटील यांच्या हस्ते गुळाचे सौदे काढण्यात आले. यावेळी कमी प्रतिच्या गुळास प्रति क्विंटल ३६०० रुपये तर उच्च प्रतीच्या गुळाला ११ हजार ३ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. गुळाला सरासरी ४२०० रुपये क्विंटल दर मिळाला. गुळाचे दर असेच उत्तरोत्तर वाढत राहावो, यामुळे गूळ उत्पादक शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतील, अशी अपेक्षा मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.
शाहू गूळ मार्केटमधील बाबुराव अतितकर यांच्या अडत दुकानात सौदे काढण्यात आले. मार्केट यार्डात पारदर्शी व्यवहार असल्याने शेतकऱ्यांची कोठेही फसवणूक होत नाही, शेतकऱ्यांनी आपला गूळ सौद्यासाठी मार्केट यार्डात आणावा, असे आवाहन सभापती भारत पाटील-भुयेकर यांनी केले. स्वागत सचिव जयवंत पाटील यांनी केले. यावेळी माजी आमदार संजय घाटगे, संचालक सूर्यकात पाटील, उपसभापती शंकर पाटील, संचालक कुमार आहुजा, प्रकाश देसाई, शेखर देसाई, नाना कांबळे, सुयोग वाडकर, बाळासाहेब पाटील, संभाजी पाटील उपसचिव के. बी. पाटील यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.