थकीत एफआरपीप्रकरणी ३९ साखर कारखान्यांना नोटिस

पुणे : प्रतिनिधी

थकीत एफआरपीप्रकरणी साखर आयुक्तांनी राज्यातील ३९ साखर कारखान्यांना नोटिस पाठवली आहे. यामध्ये एकही रुपया एफआरपी न दिलेल्या तसेच केवळ १५ टक्क्यांपर्यंतच एफआरपीचे पैसे दिलेल्या साखर कारखान्यांचा समावेश आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी ही कारवाई केली आहे. या संदर्भात येत्या २४ जानेवारीला साखर कारखान्यांच्या सुनावण्या होणार आहेत.

राज्यात थकीत एफआरपीचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून गाजत आहे. यासंदर्भात शेतकरी संघटनांनीही आक्रमक पावले उचलली आहेत. त्याची दखल घेऊन साखर आयुक्तांनी कारखान्यांना रडारवर घेतले आहे. नोटिस पाठवलेल्या ३९ पैकी २५ कारखान्यांनी एफआरपीचा एक रुपयाही शेतकऱ्यांच्या नावे  दिलेला नाही. उर्वरीत १४ कारखान्यांना सुमारे ५ ते १५ टक्क्यांपर्यंतच रक्‍कम दिलेली आहे.

यंदाच्या (२०१८-१९) हंगामात देय एफआरपीचा आकडा १० हजार ४८७ कोटी रुपये असून, शेतकर्‍यांच्या बँक खात्यांवर ५ हजार १६६ कोटी रुपये जमा झाले आहेत. तर थकीत एफआरपीची रक्‍कम ५ हजार ३२० कोटी रुपये इतकी आहे. हंगामातील १५ जानेवारीपर्यंतची ही आकडेवारी आहे. राज्यात ऊस गाळप हंगाम सुरू होऊन आता तीन महिने झाले आहेत.

दरम्यान, नोटिस पाठविलेल्या कारखान्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक ८ कारखान्यांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ सांगलीतील ५, साताऱ्यातील ३, सोलापूरमधील ६, बीडमधील ४ तसेच इतर जिल्ह्यांतील कारखान्यांचा समावेश आहे.

जिल्हानिहाय कारखान्यांची नावे अशी, कोल्हापूर जिल्हा : श्री दत्त शेतकरी, जवाहर शेतकरी, देशभक्‍त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा, शरद, श्री. तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी, गुरुदत्त शुगर, सर सेनापती संताजी घोरपडे, इको केन शुगर एनर्जी  लि. सांगली जिल्हा : महाकाली, वसंतदादा सहकारी, केन अ‍ॅग्रो डोंगराई, निनाईदेवी -दालमिया, विश्‍वासराव नाईक. सातारा जिल्हा : किसनवीर भुईंज, किसनवीर- प्रतापगड, किसनवीर खंडाळा. सोलापूर जिल्हा : बबनराव शिंदे, कुर्मदास सहकारी, सिद्धेश्‍वर, गोकुळ, विठ्ठल रिफाईंड शुगर, जयहिंद शुगर. त्याचबरोबर मधूकर (जळगाव), समृध्दी शुगर, रामेश्‍वर (जालना), माजलगाव, वैद्यनाथ, जय महेश एनएसएल, जय भवानी (बीड), रेणुका शुगर-रत्नप्रभा आणि त्रिधरा शुगर प्रा.लि. (परभणी), शीला अतुल शुगर-जय लक्ष्मी शुगर व शंभू महादेव (उस्मानाबाद), पणगेश्‍वर, श्री साईबाबा शुगर (लातूर),  गणेश सहकारी, डॉ. बी. बी. तनपुरे (अहमदनगर), शरद सहकारी (औरंगाबाद), व्यंकटेश्‍वरा (नागपूर) या कारखान्यांचा समावेश आहे.

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ऐप: http://bit.ly/ChiniMandiApp

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here