नवी दिल्ली : भारतात कोरोनाचे थैमान थांबण्याची स्थिती नाही. देशात गुरुवारी कोरोनाचे नवे ४ लाख १४ हजार १८८ नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोनामुळे होणारा मृत्यूदरही भीषण बनला आहे. गेल्या २४ तासात कोरोनामुळे ३ हजार ९१५ जणांचे बळी गेले आहेत.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोना संक्रमितांची संख्या वाढून २ कोटी १४ लाख ९१ हजार ५९८ झाली आहे तर मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या २ लाख ३४ हजार ८४ झाली आहे. देशात आतापर्यंत १ कोटी ७६ लाख १२ हजार ३५१ जण बरे झाले आहेत. तर देशात सध्या ३६ लाख ४५ हजार १६४ सक्रिय रुग्ण आहेत.
भारतात कोविड १९च्या रुग्णसंख्येने सात ऑगस्ट रोजी २० लाखांचा आकडा पार केला. मात्र संक्रमण वाढल्याने २३ ऑगस्ट रोजी ३० लाख, पाच सप्टेंबर रोजी ४० लाख, १६ सप्टेंबर रोजी ५० लाखांवर रुग्ण देशात झाले. त्यानंतर २८ सप्टेंबर रोजी रुग्णसंख्या ६० लाख, ११ ऑक्टोबर रोजी ७० लाख, २९ ऑक्टोबर ८० लाख तर २० नोव्हेंबर रोजी ९० लाख, १९ डिसेंबर रोजी १ एक कोटींचा आकडा गेला.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ज्या लोकांची कोरोनाने मृत्यू झाला, त्यापैकी ७० टक्क्यांहून अधिक लोकांना इतर आजाराने ग्रासले होते. ही आकडेवारी आयसीएमआरशी पडताळली जात आहे असे मंत्रालयाने स्पष्ट केले.