सोलापूर : टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने २०२२-२३ मध्ये गाळपास आलेल्या सर्व उसाचे बिल प्रति मेट्रिक टन दोन हजार २०० रुपयांप्रमाणे अदा केले असून, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संबंधित विविध शाखांत ४३ कोटी १७ लाख रुपये वर्ग केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांनी दिली. विश्वराज महाडिक म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या हमीवर कारखान्यास एन.सी.डी.सी. (नवी दिल्ली) यांच्यामार्फत कर्ज उपलब्ध झाले आहे. त्या माध्यमातून शेतकऱ्यांची बिले अदा केल्याचे अध्यक्ष महाडिक यांनी सांगितले.
या प्रक्रियेत एन.सी.डी.सी.चे अधिकारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, साखर आयुक्त, प्रादेशिक सहसंचालक व डी.सी.सी.बँक प्रशासक यांचे आभार मानले. भीमा परिवाराचे मार्गदर्शक संचालक खा. धनंजय महाडिक यांनी एन.सी. डी.सी. च्या माध्यमातून कर्ज उपलब्ध त्यांचेही आभार मानण्यात आले.
कारखान्याकडे चालू गळीत हंगामासाठी नऊ हजार १३९ हेक्टर उसाची नोंद असून, नऊ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ऊस वाहतुकीसाठी कारखान्याने २७५ ट्रॅक्टर, ६०० बैलगाडी, ३५० मिनी ट्रॅक्टर यांच्याशी करार केला आहे. कारखान्या अंतर्गत सर्व मशिनरींची कामे अंतिम टप्प्यात आली असेही महाडिक यांनी सांगितले.
इथेनॉल प्रकल्पाचे लवकरच भूमिपूजन…
भीमा कारखाना मागील काही वर्षांपासून अनेक नैसर्गिक व मानवनिर्मित अडचणीतून मार्गक्रमण करीत असतानाही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस देऊन सहकार्य केले. त्यासाठी अध्यक्ष महाडिक यांनी शेतकऱ्यांचे आभार मानले. भीमा कारखाना कार्यस्थळावर इथेनॉल निर्मिती प्रकल्प सुरू करण्यासाठी लागणाऱ्या पूर्व परवानग्यांची पूर्तता करण्याचे काम सुरू असून लवकरच भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष महाडिक यांनी दिली.