पुणे : एका व्यापाऱ्याला कमी दरात साखर देण्याचे आमिष दाखवून ४५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सुनील शिवराम गेहलोत (वय ३८, रा. भेलकेनगर, कोथरूड) यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून सांगलीतील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. जून २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूड पोलिसांनी, व्हीडीपी स्वाद फूडसचे संचालक संशयित विक्रम दिनकर पाटील (वय ४१) आणि दिग्विजय दिनकर पाटील (वय ३८, दोघे रा. अजिंक्यनगर, सांगली) अशा दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. गेहलोत यांचे कोथरूड परिसरात बालाजी ट्रेडिंग कंपनी नावाचे किराणा दुकान आहे. पाटील यांनी गेहलोत यांना कमी दरात साखर मिळवून देतो, असे सांगून साखर पुरवठा करण्याच्या ऑर्डर घेतल्या. सुरुवातीला पाटील यांनी काही प्रमाणात साखर पाठवून विश्वास संपादन केला. त्यानंतर दीडशे टनांची साखरेची ऑर्डर दिली. त्यासाठी गेहलोत यांनी पाटील यांच्या बँक खात्यात ४५ लाख जमा केले. मात्र, पाटील यांनी या ऑर्डरनुसार साखर पुरवठा केलेला नाही. ही रक्कम परस्पर वापरून अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.