परभणी : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील १२ साखर काराखान्यांनी यंदाच्या गळीत हंगामात १८ मार्चअखेर ४७ लाख ९३ हजार ७०२ टन ऊस गाळप केले. या कारखान्यांनी आतापर्यंत एकूण ४७ लाख ३४ हजार ७८० क्विंटल साखर उत्पादित केली आहे. सद्यस्थितीत परभणी जिल्ह्यातील ३ आणि हिंगोली जिल्ह्यातील १ साखर कारखान्याचा गळीत हंगाम समाप्त झाला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. परभणी जिल्ह्यातील ७ खासगी साखर कारखान्यांनी ३३ लाख ४ हजार ७२३ टन उसाचे गाळप केले. सरासरी ९.८७ टक्के उताऱ्यासह ३२ लाख ६० हजार ३८० क्विंटल साखर उत्पादन घेतले. ऊस गाळपात गंगाखेड शुगर्स तर साखर उताऱ्यात रेणुका शुगर कारखाना आघाडीवर आहे.
हिंगोली जिल्ह्यातील ५ साखर कारखान्यांनी एकूण १४ लाख ८८ हजार ९७९ टन उसाचे गाळप केले. सरासरी ९.९ टक्के उताऱ्यासह १४ लाख ७४ हजार ४०० क्विंटल साखर उत्पादीत केली आहे. ऊस गाळपामध्ये वाकोडी येथील शिऊर साखर कारखाना आघाडीवर आहे. या कारखान्याने सर्वाधिक ४ लाख २३ हजार १४४ टन ऊसाचे गाळप केले आहे. तर साखर उताऱ्यात वसमत येथील पूर्णा सहकारी साखर कारखाना आघाडीवर आहे. या कारखान्याचा उतारा जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे १०.४७ टक्के आहे.