सांगली : पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी, हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दोन्ही पॅनेलमधून दोन दिवसात ४९ अर्ज दाखल झाले आहेत. शुक्रवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख होती.कारखान्याची निवडणूक बिनविरोध होईल असे वाटत होते. मात्र, चंद्रशेखर शेळके यांनी विरोधी पॅनेल उभे केल्यामुळे बिनविरोधची आशा संपुष्टात आली आहे. शेळके यांनी प्रत्येक गटातून उमेदवार उभे केले आहेत.
हुतात्मा कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून बरेच प्रयत्न केले, त्याला यश म्हणून अंकुश अहिर व नंदकुमार शेळके यांनी हुतात्मा गटात प्रवेश करून पाठिंबा दिला. मात्र त्यांचे बंधू चंद्रशेखर शेळके यांनी जय हनुमान हुतात्मा पॅनेल स्थापन करून कारखाना कार्यक्षेत्रातील १५ गावांत बजरंग थोरात, धनाजी शिंदे, विक्रम शिंदे, जयवंत मदने यांच्यासमवेत प्रचाराच्या सभा घेऊन सभासदांना भेटून आपला विरोध प्रकट केला आहे. वैभव नायकवडी यांनीही प्रचाराच्या सभा घेऊन आपली भूमिका मांडली आहे. आता अजिबात माघार नाही, निवडणूक लढवणारच, अशी शेळके यांनी घोषणा केली आहे.