अहिल्यानगर : श्रीगोंदा येथील नागवडे सहकारी कारखान्याने यंदा ५ लाख ८५ हजार टन उसाचे गाळप करून ६ लाख ३४ हजार ४२५ क्विंटल साखर उत्पादित केली. कारखान्याच्या गळीत हंगामाची रविवारी सांगता झाली. कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, उपाध्यक्ष भोस व संचालक मंडळाचे हस्ते शेवटची मोळी टाकण्यात आली. यावर्षीचा सरासरी साखर उतारा १०.९२ टक्के इतका मिळाला. कारखान्याने उसाचे १५ फेब्रुवारी अखेर प्रति मेट्रिक टन २७०० रुपयांप्रमाणे पेमेंट अदा केले आहे. उर्वरित पेमेंट लवकरच अदा करण्यात येणार आहे, असे कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सतीश जांभळे यांनी सांगितले.
प्र. कार्यकारी संचालक जांभळे यांनी सांगितले की, दिवंगत शिवाजीराव बापू नागवडे यांच्या विचार प्रेरणेने कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, सर्व संचालकांच्या मार्गदर्शनाखाली ऊसतोड मजुरांच्या अडचणींवर मात केली. कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पामधून ४ कोटी ६९ लाख ८४ हजार ९०० युनिट वीजनिर्मिती झाली. त्यापैकी २ कोटी ७९ लाख ८२ हजार ७८२ युनिट वीज निर्यात केली आहे. तसेच आसवनी प्रकल्पामधून २० लाख ५५ हजार ४२१ लिटर रेक्टिफाईड स्पिरीट उत्पादन झाले आहे. त्यासाठी ७ हजार ६३१.०७८ टन मळीचा वापर करण्यात आला, असे यावेळी सांगण्यात आले.