नांदेड : पूर्णा सहकारी साखर कारखान्याने या वर्षी ५ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. सभासदांनी आपला जास्तीत जास्त ऊस कारखान्याला पाठवावा, असे आवाहन पूर्णा साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा भारतीय साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी केले. कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन व गव्हाण पूजन सोहळ्यात ते बोलत होते. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात १० ते ११ लाख टन उसाची नोंद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार राजू नवघरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. सुनीलराव कदम व त्यांच्या पत्नी डॉ. शिला कदम, संचालक बालासाहेब बारहाते, मीरा बारहाते, संचालक श्रीधर पारवे, गंगासागर पारवे यांच्या हस्ते बॉयलर अग्नीप्रदीपन व गव्हाण पूजन करण्यात आले. माजी आमदार पंडितराव देशमुख, शहाजी देसाई, प्रल्हादराव काळे, कार्यकारी संचालक सुनील दळवी, बाजार समितीचे सभापती तान्हाजी बेंडे, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास राव भोसले, बालाजी ढोरे, सुभाष लालपोतू आदी यावेळी उपस्थित होते.
जयप्रकाश दांडेगावकर म्हणाले की, साखर कारखानदारी आणि ऊस उत्पादकांना चांगले भवितव्य आहे. ऊर्जा ही जगाची अन्नाएवढीच महत्त्वाची गरज बनली आहे. त्यामुळे आगामी काळात उसाला चांगले दिवस येणार आहेत. ऊर्जा ही जगाची गरज बनल्याने उसासाठी काहीही भाव द्यायला मागेपुढे पाहिले जाणार नाही. त्यासाठी साखर कारखाने टिकवणे गरजेचे आहे. साखर कारखानदारी ही आता केवळ साखरेच्या उत्पादनापुरती मर्यादित न राहता ‘एनर्जी हब’ बनली आहे.