पुणे : इंडियन शुगर ॲण्ड बायोएनर्जी मॅन्यूफ्रॅक्चर्स असोसिएशन (इस्मा) ने दिलेल्या माहितीनुसार, देशात यंदा एप्रिलच्या मध्यापर्यंत सर्वाधिक १०९ लाख टन साखर तयार करून महाराष्ट्र उत्पादनात अग्रेसर आहे. तर १०१ लाख टन साखर निर्मिती करत उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. कर्नाटक आणि गुजरात या दोन राज्यांचा हंगाम पूर्णपणे आटोपला आहे. कर्नाटकात यंदाच्या हंगामात ५० लाख, तर गुजरातमध्ये ९ लाख टन साखर उत्पादन झाल्याची माहिती ‘इस्मा’ने दिली आहे. यंदा देशात ५३२ साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केला होता. त्यापैकी ४४८ कारखान्यांचा हंगाम संपला आहे.
यंदा देशातील साखर उत्पादन गेल्यावर्षीच्या तुलनेत केवळ २ लाख टनांनी कमी आहे. १५ एप्रिलअखेर देशात ३१० लाख टन साखर उत्पादित झाली. गेल्यावर्षी समान कालावधीत ३१२ लाख टन साखर निर्मिती झाली होती. तसेच गेल्यावर्षी कर्नाटकात ५४ लाख टन साखर तयार झाली होती. यंदा ती ५० लाख टनावर आहे. गुजरातमध्ये गेल्यावर्षी इतकीच, ९ लाख टन साखर निर्मिती झाली आहे. तमिळनाडूमध्ये ८ लाख टन साखर उत्पादित झाली असून ती गेल्या वर्षीपेक्षा २ लाख टनांनी कमी आहे. सद्यस्थितीत देशात ८४ साखर कारखाने सुरू आहेत. दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्राचा हंगाम काहीसा उशिरा संपणार आहे. १५ कारखाने सुरू असून आणखी दहा ते पंधरा दिवस हंगाम चालेल.