कोल्हापूर : इको केन शुगरच्या बॉयलर विभागातील वेस्ट बगॅस जाणाऱ्या बेल्टची सफाई करताना झालेल्या अपघातात गोल्याळी (ता. खानापूर) येथील कामगार नामदेव नागो गुरव (वय ३८) यांचा मृत्यू झाला. कारखान्याने ५० लाखांची मदत दिल्यानंतरच ग्रामस्थ व नातेवाईकांनी त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. याबाबत ॲड. संतोष मळवीकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनानंतर कारखान्याने ही मदत दिली.
म्हाळुंगे येथील या कारखान्यात ३१ डिसेंबर रोजी अपघात झाला होता. कारखान्याने गुरव यांच्या कुटुंबियांना ठराविक रक्कम जाहीर केली. पण ग्रामस्थ व कुटुंबीयांना ती मान्य नसल्याने ॲड. संतोष मळवीकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ व नातेवाईकांनी गुरव यांचा मृतदेह कारखान्याच्या आवारात आणून ठेवला. त्यानंतर कारखाना प्रशासनाचे अधिकारी सतीश अनगोळकर यांनी घटनास्थळी भेट दिली. कारखाना प्रशासन व नातेवाईकांत बाचाबाची झाली. त्यानंतर ॲड. मळवीकर यांच्या मध्यस्तीने त्या कुटुंबाला पन्नास लाख रुपये देण्याचे कारखान्याने जाहीर केले.